Blog - Dhanvantari Hospital Mangaon Sawantwadi Kudal Konkan

Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Ph : (02362) 236236, 236102, 236436.
Ph : (02362) 236236, 236102.
Go to content
माझे सायकलिंग
Thank you PAWS team ...
Thank you पुष्कर, डॉ धीरज and डॉ मिलिंद....
           सिंधुदुर्गात physical fitness ने एव्हाना चांगलंच मूळ धरलयं.....
Personal exercise  बरीच जणं करत होती, पण डॉ Raoraneसरांच्या मेहनतीमुळे या रोजच्या व्यायामाचे रुपांतर ग्रुप activity मध्ये झाले. Gents डॉक्टरांचा ‘रांगणा रनर’ ग्रुप तयार झाला....डॉक्टर महिलांचा ‘रांगणा रागिणी’ ग्रुप तयार झाला. अनेक जण motivate झाली. ग्रुपमध्ये डॉक्टरांसोबतच व्यायामप्रेमी इतरही लोकं येऊ लागले. आतातर छोटे मोठे ग्रुप events होऊ लागलेत. मॅराथॉन असो, सायकलिंग असो किंवा किल्ले पार करणं असो.. ... . Doctors  हिरिरीने भाग घेऊ लागलेत ही खूप चांगली गोष्ट आहे.
    मला अजून आठवतं....... एका marathon च्या वेळी डॉ Raoraneसरांनी  मी भाग घेण्यासाठी मला personally फोन केला होता... मी अदबीने सांगितले होते, “नाही सर... मला नाही जमणार”... “मला allergic asthma चा त्रास होतो... एवढ्या सकाळी थंडीमध्ये खूप चालू नाही शकत मी..... त्यावेळी सरांनी सांगितलं, “ अहो मॅडम म्हणूनच तुम्ही बाहेर पडा... मलाही त्रास आहे पण मी आत्तापर्यंत 50 – 60  वेळा तरी रांगणा गडावर जाऊन आलोय”..... ते पुढे म्हणाले, “मी पहाटे पाच वाजता बाहेर पडतो आणि गडावर जाऊन परत 9 वाजता OPD मध्ये येतो.”...ते ऐकून मला बसल्या जागी चक्कर येणंच फक्त बाकी होतं....
                 सरांनी फोन केला होता त्या run ला खरतर मी गेले नाही... पण निदान मनात विचार यायला सुरुवात झाली.... तेही जर आपल्यासारखे आहेत आणि इतक्या मोठ्या activities  करू शकतात तर आपणही छोटी मोठी activity try करून बघायला काय हरकत आहे?  माझी एक मोठी चूक माझ्या लक्षात आली की मी “Prevention is better than cure”  या उक्तीप्रमाणे गारव्यात, धुळीत न जाणं हे आपल्यासाठी जास्त योग्य आहे असा स्वतःचा समज करून घेतला होता..... तो सोयीस्कर रित्या करून घेतलेला गैरसमज चुकीचाच होता हे सरांच्या निमित्ताने का होईना पण लक्षात आलं....Outdoor activity हे आपल काम नाही.... आपल्याला त्रास होईल... अस्थमा चा attack येईल असा विचार करण्यापेक्षा  हळू हळू Stress ला face करत स्वतः ची immunity  आणि durability वाढवायला हवी असं आतून वाटायला लागलं....
       तशी गेली वर्ष दोन वर्षं  मी माझ्या हेल्थ च्या बाबतीत conscious झाले होते..... या काळात regular छोट्या मोठ्या indoor workout च्या आधाराने stamina वाढला होता...पण outdoor साठी मला स्वतःला कॉन्फिडन्स येत नव्हता.....
               PAWS ने cycle ride  declareकेली आणि अचानक मनातून वाटायला लागलं.... चला, बघुया try करून.... काय होईल?  फारतर ट्रॅक नाही complete करता येणार,  हरकत नाही.... पण बघुया तरी स्वतःला थोडसं stretch करून.....!
               शाळा कॉलेज मध्ये असताना सायकल चालवत होते पण अनेक वर्षांपासून तिचा संबंध तुटला होता.... डॉ माधवी Kashalikarआणि पुष्कर Kashalikarया मायलेकांनी पुन्हा सायकल चालवू शकेन हा confidence दिला.... घरी माझ्या लेकाची सायकल होती पण ती gear ची.... मलाही मनातून gears ची सायकल try करायचीच होती. दोन्ही मुलांनी अंगणातल्या अंगणात छान ट्रेनिंग दिले.... मग एकदा डेअरिंग करून काढली सायकल रस्त्यावर..... मस्त मजा आली.... थोडी अडखळले gears बदलताना.... पण अजून थोड्या practice ने जमेल असं वाटायला लागलं ....मला मुळात चालण्यापेक्षा cycling ची आवड अधिक आहे आणि gears चे technique शिकले तर long ride ला मस्त मजा येईल याची जाणीव झाली.
Cycle  rideसाठी अजूनही नाव दिले नव्हते....25 km / 50 km आणि 100 km असे भाग केले होते... एंट्री देण्यासाठी last date किती आहे  हे विचारण्यासाठी Drधीरजला  फोन केला. साधारण आठवडा शिल्लक होता.... पण मला मात्र पूर्ण confidence वाटत नव्हता.... रोज आपली नुसतीच सायकल चालवावी.... ती रन बिन जाऊदे बाजूला.... असा रोज मनात विचार येत होता.... डॉ धीरजला फोन केला तर तो म्हणाला.... ओ काय madam,  निदान 50 km ला तरी नाव द्या... 25 km काय कुणीही जाता जाता करतं.... मी मनातल्या मनात डोक्‍याला हात लावला.....!
DrMilindहा तर डोळ्यासमोरचा fitness  icon.... एक दोनदा operation theater मध्ये भेटला.... Operation नंतर चर्चा तीच.... Cycling ची..... त्याने सुद्धा काही महत्त्वाच्या tips दिल्या....
    शेवटी आठ दिवस आधी एकदाचे नाव दिले.... practice ला सुद्धा सुरुवात केली.... सायकलला जरा तेलपाणी करावे म्हणून सायकल पुष्करकडे आणून दिली.... संध्याकाळी ठीकठाक करून परत देतो असं सांगुन तीन दिवस झाले तरी त्याला सायकलला हातही लावायला वेळ मिळत नव्हता.... माझ्या सारख्या अनेक जणांच्या सायकली... अनेक नवीन लोकांनी त्याच्याकडून cycles मागवल्या होत्या... त्याच्या deliveries ....आता काय करायचं?  Practice तर करणं गरजेचं होतं आणि त्याहीपेक्षा सायकल चालवायला मनापासुन आवडत होतं..... त्यामुळे खाडा करावा असं वाटत नव्हतं... ... मग काय? सकाळी माणगाव मधून कार चालवत पुष्करच्या घरी जायचं.... तिथून सायकल घेऊन 8/10 km  सायकलिंग करायचं.... सायकल परत त्याच्या ताब्यात द्यायची आणि “आज नक्की नीट करून दे सायकल...” असा त्याला दम देऊन घरी यायचं.... हे रुटीन सुरु झालं. पण यात फायदा असा झाला की त्याची आई आणि चांगली “सायकल स्वारीणी” माधवी हिच्या तालमीत सायकल सराव झाला.... Gears चा मस्त अंदाज आला.... डॉ नेत्रा सुद्धा यायची आमच्या सोबत.....तिने सुद्धा नवीन सायकल book केली होती पण ती अजून आली नव्हती... मग ती two व्हीलर घेऊन यायची, तिथली एखादी सायकल घेऊन प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस झाली की two व्हीलर घेऊन घरी जायची.....आम्ही तिघी रोज नव्या ट्रॅक वर जायचो... मस्त वाटायचं.. .. मुख्य म्हणजे दिवसभर फ्रेश सुद्धा वाटायचं....
                     डॉ संजना, डॉ अश्विनी आणि डॉ मानसी यांनी सुद्धा प्रॅक्टिस सुरू केली होती..... त्या तर पट्टीच्या सायकल चालवणार्‍या.... शेवटचे तीन चार दिवस  सावंतवाडीत सकाळी सगळ्या रस्त्यांवर सायकल स्वार दिसत होते .... सायकल चालवता चालवता हेल्मेट आणि मफलरच्या आत कुणी ओळखीचा चेहरा दिसतो का ते पहायचं आणि एकमेकांना हात करायचा.... डॉ कठाणे, डॉ पावसकर आणि डॉ नवांगुळ एक दोनदा दिसले.... पावसकर सरांची नवीन सायकल खूप छान दिसत होती.. एकंदरीत सगळीकडे सायकल fever आला होता...
                घरात एकच  सायकल.... त्यात त्याच दिवशी नवरा family function साठी बाहेर जाणार होता....नेमकं त्याचं जाणं तीन दिवस आधी रद्द झालं.... मग नवर्‍याने सुद्धा नाव दिलं आणि ते ही 50 km साठी..... पण सायकल कुठून पैदा करायची? डॉ योगिताच्या मदतीने हायस्कूल मध्ये जाणार्‍या एका मुलाची सायकल मिळाली.... तिने सांगताना स्वतः साठी पाहिजे असे सांगितले पण तिने जेव्हा दुसऱ्याला  चालवायला दिलीये असे त्या मुलाला कळले तेव्हा तो तिरीमिरीत येऊन आल्या पावली सायकल परत घेऊन गेला.... खूप हसलो आम्ही... पण सायकल चा प्रश्न अनुत्तरीत राहीला होता.... नेमके एका अर्जंट कामासाठी आम्हा दोघांना कोल्हापूरला जावे लागले.... माहेरी भावाची सायकल होती.... त्याने लंडनला असताना विकत घेतली होती.... भावाने सांगितले ही घेऊन जा.... आणि नवरोबा जाम खुश झाला....!   ती एकदम नवीन आणि imported सायकल होती..... ह्या सायकलवर तू डोळा नाही ठेवायचा असं मला बजावून त्याने सायकलचा ताबा घेतला. कोल्हापूरात दोन तास आणि चार दुकानं फिरून आमच्या आणि मित्रमैत्रिणींसाठी asseceriesविकत घेतल्या. दुसर्‍या दिवशी पहाटे सायकलचे पुढचे चाक काढून कारमध्ये बसवली आणि माणगावात आलो. सायकल ride  च्या आदल्या दिवशी दोघांनी माणगाव ते सावंतवाडी आणि return to home असा 23 km चा दौरा केला.
        माणगावातून आम्ही तिघे सायकलस्वार होतो.... मी, योगिता आणि माझा नवरा..... आदल्या रात्री योगिता च्या नवर्‍याच्या ओळखीने एक टेम्पो आणला आणि तिन्ही सायकली डॉ शेखरच्या घरी नेऊन ठेवल्या.... सकाळी साडेचार वाजता आम्ही दोघे आणि योगिता व तिचा नवरा असे आमच्या कारने बाहेर पडलो... शेखरच्या घरापासून एक दीड किलोमीटर वर starting point होता पण त्या रस्त्यावर एक मोठा चढ होता. सायकलिंगच्या आधी अजिबात दमायचे नाही, त्या चढावावर सायकल हातात धरून चालायचे असे ठरवले असूनही भिरकीत तो चढ सायकल चालवत कसा पार केला ते कळलंच नाही.
             तलावाच्या समोर खूप नियोजनबद्ध आणि शिस्तीत सर्व काही व्यवस्था करण्यात आली होती. त्या नंतरचा वेळ ही निव्वळ enjoyment होती.... आधी 100 km, त्यानंतर थोड्या वेळाने 50 km व सर्वात शेवटी 25 km वाल्यांची ride सुरू झाली..... रस्त्यात कुठेही गोंधळ नाही, दाटीवाटी नाही.... थोड्याच वेळात प्रत्येकाने आपापला speed पकडला आणि मस्त मजेत ride पूर्ण केली.... जाताना मी आणि डॉ सागर रेडकर almost same होतो पण येताना चढावावर मी थोडीशी मागे पडू लागले... तो बिचारा हळू चालवत मला सोबत करत होता पण मग मीच त्याला सांगितले... तू जा पुढे.. नको थांबूस माझ्यासाठी.... शेवटचा चढ चढताना खूपच दमछाक झाली होती.... पण मागे डॉ YN सावंत होता... चल गौरी थांबू नकोस... एवढं वळण पार केलंस की पुढे उतार सुरू होणार असं सांगत राहिला... शेवटी मी समोरून एकदा रस्ता बघितला आणि मान खाली घालून पेडल्स मारायला सुरुवात केली..... चाकं आपोआप हलकी जाणवायला लागल्यावरच रस्त्याकडे पाहिलं आणि पायात अचानक जोर आला..... त्यानंतर अक्षरशः थर्ड गियर मध्ये सायकल पळवत end point कडे आले.... जाऊन येऊन एक तास 40 मिनिटे..... माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता..... माझ्या बरोबरच नेत्रा सुद्धा पोचली.... 25 km Ladies मध्ये दुसरा नंबर हा ही एक सुखद धक्का.... अश्विनी आमच्या आधी म्हणजे एक तास 24 मिनिटात पोचली होती.....
       योगिताच्या सायकलला काहीतरी problem झाला त्यामुळे ती खूप उशीरा पोचली.... खरंतर तिचा stamina आणि speed दोन्ही जास्त असल्यामुळे ती लवकरच पोचेल अशी अपेक्षा होती. मला खूप वाईट वाटलं.... ती येईपर्यंत मी थांबले.... तोपर्यंत माझा नाश्ता होऊन rest घेऊन मी fresh झाले होते. नवर्‍याचाही फोन आला... तो ही 35 km cross करून पुढे आला होता. आता पुढचा प्रश्न.... घरी कसं जायचं?  योगिताला विचारलं जाऊया का माणगावला परत सायकल घेऊन?  ती ही तयार झाली.... तिच्या नवर्‍याला सांगितलं काही प्रॉब्लेम आला तिच्या सायकलला तर आमच्या कार मध्ये टाक आणि घरी घेऊन ये..... परत माणगावला येताना 25 km पूर्ण केल्याच्या आनंदात छोटे मोठे चढ कसे पार केले ते कळलेच नाही.
       घरी येऊन सोफ्यावर आडवी झाले आणि एक साक्षात्कार झाला.....!
     अरेच्चा, आज नाही म्हणता म्हणता आपण 39/40 km सायकल चालवली.... म्हणजे पुढच्या वेळेस अजून प्रॅक्टिस केली तर आपण 50 km नक्की करू शकू......
डॉ गौरी गणपत्ये
9423511070
महिला आणि हिमोग्लोबिन

कुटुंबात महिलेचं स्थान शरीरातल्या पाठीच्या करण्यासारखं आहे. जसा पाठीचा कणा शरीराचा आधार असतो, त्याप्रमाणेच घरातील स्त्री ही त्या कुटुंबाचा खऱ्या अर्थाने आधार असते. पाठीच्या कण्याला छोटीशी जरी इजा झाली तरी शरीराचा balance बिघडतो,  तसेच कुटुंबातील स्त्रीच्या आरोग्याला धोका निर्माण झाला की कुटुंबाचा balance बिघडण्याचा धोका असतो. यासाठीच स्त्रियांचे आरोग्य समाजाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. “जनन” कर्म करून जन्म देते म्हणून “जननी” या अर्थाने सुध्दा स्त्री कडे आपण मातेच्या आदराने बघतो. जिच्या कुशीतून भावी पिढी जन्माला येते तिच्या आरोग्याची समाजाने नक्कीच काळजी घेतली पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हे नुसार वेगवेगळ्या वयोगटातील महिलांमध्ये anemia चा धोका सर्वात जास्त असतो.

आज आपण समजून घेऊ की अॅनिमिया म्हणजे काय? आणि त्याला इतके महत्व का आहे?

साध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर anemia म्हणजे शरीरातील रक्तपेशींमध्ये कमतरता असणे. ही कमतरता अनेक प्रकारांची असू शकते व त्यानुसार शरीरावर दिसणारे परिणाम ही वेगवेगळे असतात. अॅनिमियाचे साधारणपणे चारशेपेक्षाही अधिक प्रकार बघायला मिळतात परंतु ढोबळमानाने खालीलपैकी तीन प्रकारात अॅनिमियाचे वर्गीकरण करता येते.

१. अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे (Excess blood loss)

२. रक्तपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे (Decreased or Faulty blood production)

३. रक्तपेशींचा अधिक प्रमाणात नाश झाल्यामुळे (Destruction of red blood cells)

काही प्रकारचे जुनाट आजार, शरीरात आयर्न शोषण करून घेण्याच्या प्रक्रियेत असणारा अडथळा, रक्तपेशींमध्ये असणाऱ्या कमतरता, कॅन्सर, रेडियोथेरपी या सारख्या काही कारणांचासुद्धा हिमोग्लोबीनवर परिणाम होतो.

सर्व वयोगटामध्ये व विशेषत: स्त्रियांमध्ये Iron Deficiency Anemia हा जास्तीत जास्त प्रमाणात आढळून येतो. आयर्न म्हणजे शरीरातील लोह घटक. पुरुषांच्या शरीरात  4 ग्रॅम तर स्त्रियांच्या शरीरात साधारणपणे 3.5  ग्रॅम आयर्नचा साठा असतो. शरीरात 70 % आयर्नचा साठा हिमोग्लोबीन आणि मायोग्लोबीन यात साठवलेला असतो. तर उर्वरित भाग हा लिव्हर, इतर पेशी व शरीर घटकांमध्ये विभागलेला असतो.

हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमध्ये आढळणारे एक प्रकारचे प्रोटीन आहे तर मायोग्लोबीन हे स्नायू पेशीमध्ये आढळणारे प्रोटीन आहे. रक्तपेशीला किंवा स्नायू पेशीला लाल रंग येण्यासाठी यात हिम नावाचा  घटक कारणीभूत असतो. फुफुसाकडून मिळणारा शुद्ध ऑक्सिजन शरीरातल्या प्रत्येक पेशींपर्यंत पोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करते. शरीरात मसल्स ( स्नायू पेशी ) मध्ये ऑक्सिजन पोचवणे व साठवणूक करणे हे काम मायोग्लोबीन करते. हिमोग्लोबीन आणि मायोग्लोबीन यामध्ये तुलना करता हिमोग्लोबीनमध्ये ऑक्सिजन सैलसर रित्या रक्तपेशीना चिकटला असतो त्यामुळे तुलनात्मक रित्या हिमोग्लोबीन मधला ऑक्सिजन शरीराला जास्त लवकर उपलब्ध होतो. म्हणूनच ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असते, त्यांची कोणतेही काम करण्याची क्षमता अधिक असते.

शरीरात प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पोचवण्यासाठी, शरीराची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी शरीरात  हिमोग्लोबिनचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे.

स्त्रियांच्या शरीरात हिमोग्लोबिनला महत्व कशासाठी ?

स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर त्यांच्या आयुष्यातील काही टप्पे असे आहेत की त्या टप्प्यांवर त्यांना अधिक पोषक अंशांची गरज असते, शरीराची ऑक्सिजनची मागणी वाढलेली असते.

बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वार्धक्यावस्था या आयुष्याच्या तीन अवस्था आहेत. यातील बाल्यावस्था व वार्धक्यावस्थेत स्त्री व पुरुषांमध्ये फारसा फरक नसतो पण तारुण्यावस्थेचा विचार केला तर स्त्रीच्या तारुण्यावस्थेत अनेक टप्पे / वळणं येतात. उदा. मासिक पाळीची सुरुवात, लग्न, गरोदरपणा, बाळंतपण, मुलांचे संगोपन, रजोनिवृत्तीचा काळ अशा अनेक टप्प्यांवर तिची शारीरिक व मानसिक ओढाताण होते. अशा वेळी शरीराला अधिक पोषकांशांची व अधिक उर्जेची गरज असते.

आता आपल्या लक्षात आले असेल कोणत्याही कारणांनी असो, शरीरात एखाद्या रक्तघटकाची कमतरता निर्माण झाली की त्याचा परिणाम शरीराच्या कार्यक्षमतेवर होतो

स्त्रियांच्या बाबतीत हिमोग्लोबीन कमी होण्याची कारणे कोणती ?

हिमोग्लोबीन कमी होण्याची अनेक कारणे असतात. पोषक आहार न घेणे, मुळव्याधीच्या जखमेतून रक्त पडणे, कृमींचा त्रास असणे, रक्त घटक कमतरता इ. स्त्रीला तारुण्यावस्थेत मासिक पाळीच्या वेळी दर महिन्याला शरीरातून रक्तस्त्राव होत असतो. अत्यधिक रक्तस्त्रावामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण घटते. गरोदरपणात एका जीवाच्या निर्मितीसाठी शरीराची बहुतांश ताकद खर्ची पडते. गरोदरपणात व बाळंतपणात शरीराची पोषकांशाची व उष्मांकांची मागणी वाढते. ही मागणी आहारातून पुरी केली गेली नाही तर त्या घटकांची कमतरता निर्माण व्हायला लागते व कालांतराने वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमिया डोकावू लागतात. बऱ्याच अॅनिमियाची परिणती आयर्नच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अॅनिमिया मध्ये होते.

शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असावे ?

W.H.O ( World Health Organization ) च्या अभ्यासानुसार adult व्यक्तीमध्ये 12.5 ग्रम पेक्षा कमी हिमोग्लोबीन असल्यास त्याला अॅनिमिया म्हणावे.

आपल्या देशातील रहाणीमान बघता आपल्याकडे साधारणतः 11 ग्रॅम ही हिमोग्लोबीनची किमान आवश्यक पातळी मानली आहे. त्यानुसार अॅनिमियाचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे -

Mild : 9 – 11
Moderate : 7 – 9
Severe : < 7
हिमोग्लोबीन कमी असल्यास शरीरावर कोणती लक्षणे दिसतात ?
शरीरात किती प्रमाणात हिमोग्लोबीन आहे, अर्थात कोणत्या प्रकारात मोडणारा अॅनिमिया आहे, यावर लक्षणे व लक्षणांची तीव्रता अवलंबून असते. तरीसुद्धा सर्वसाधारणपणे हिमोग्लोबीन कमी झाल्यास खालील लक्षणे दिसतात –
थोडे काम केल्यावर दमल्यासारखे वाटणे.
चालताना धाप लागणे
डोकेदुखी, चक्कर
हृदयाची धडधड वाढणे
कोरडी, निस्तेज त्वचा
पायात गोळे येणे
वारंवार तोंड येणे, तोंडाला आतून जखमा होणे
नखं ठिसूळ होणे
याव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीनुसार लक्षणे बदलू शकतात. माती / कच्चा तांदूळ / खडू / खावेसे वाटणे, हातपाय थंड पडणे, वरचेवर कसलीही infections होणे यापैकी सुद्धा काही लक्षणे दिसतात.

हिमोग्लोबीनचे प्रमाण किती आहे अर्थात अॅनिमिया किती तीव्र स्वरूपाचा आहे ते ठरवून त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते. आयर्नच्या गोळ्या, सायरप, इंजेक्शन किंवा अॅनिमिया खूप तीव्र असल्यास प्रत्यक्ष रक्त किंवा रक्त घटक सलाईन द्वारे दिले जाते.

शरीरात रोज आयर्नची किती प्रमाणात गरज असते ?
वय, लिंग आणि वयाची अवस्था यानुसार शरीरात रोज आयर्नची किती गरज आहे ते ठरते. मासिक पाळीच्या वेळी होणारा रक्तस्त्राव, सगर्भावस्थेत व बाळंतपणात वाढलेली शारीरिक गरज पहाता तरुण अवस्थेत स्त्रींयांना पुरुषांपेक्षा अधिक आयर्नची गरज असते.

तरुण अवस्थेतील पुरुषाला दर दिवशी 8 मिलीग्रॅम तर स्त्रीला 16 मिलीग्रॅम आयर्नची गरज असते. मासिक पाळी बंद झाल्यानंतर ही गरज पुन्हा 8 मिलीग्रॅम इतकी होते.

व्यक्ती निरोगी असली तरी चयापचयाच्या क्रियेमध्ये फक्त 20 - 25 % इतकेच आयर्न शरीरात absorb होते. हे लक्षात घेऊन त्याप्रमाणात आहारात लोहयुक्त घटकांचा समावेश केला पाहिजे. व्हिटामिन C च्या सोबत घेतल्यास आयर्न शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते.

आहारातून आयर्नचा पुरवठा कसा होतो ?
वेगवेगळ्या प्रकारची धान्यं,कडधान्यं आणि पालेभाज्या यामध्ये लोह तत्व पुरेशा प्रमाणात असते. धान्यवर्गापैकी बाजरी आणि नाचणी यामध्ये लोह घटक अधिक प्रमाणात असतात. रोजच्या आहारात ५० ग्रॅम पालेभाजी खाल्ली तरी आयर्नची दिवसभराची गरज पूर्ण व्हायला मदत होते. वनस्पतीपासून मिळणाऱ्या आयर्न पेक्षा प्राणीज पदार्थातून मिळणारे लोह शरीरात लवकर शोषले जाते.

आयर्न मिळवण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे लोखंडी भांड्यांचा वापर .... चपाती, भाकरी करताना निर्लेप तव्याऐवजी लोखंडी तव्याचा वापर करावा. लोखंडी कढई, झारे, उलथणे अशा लोखंडी वस्तूंचा वापर करावा, लोखंडी भांड्यांमध्ये अन्नपदार्थ तयार केल्यास लोहाचे अंश त्यात उतरतात.

आहारात प्रामुख्याने vegetarian आणि Non vegetarian असे दोन  प्रकार आहेत. आहारातून मिळणाऱ्या आयर्न Iron चेही Heme iron आणि Non Heme  iron  असे दोन प्रकार आहेत.  वनस्पती स्त्रोतांमध्ये Non heme  iron असते तर प्राणीज स्त्रोतांमध्ये उदा. प्राण्यांचे मांस,लिव्हर,गोड्या / समुद्राच्या पाण्यातील मासे, पोल्ट्री घटक यामध्ये Non heme iron अधिक प्रमाणात असते. Hemeआयर्न पासून लोह घटक शरीरात लवकर व सोप्या पद्धतीने शोषले जातात. त्यामानाने Non heme iron कमी प्रमाणात शोषले जाते.

आहारशास्त्र आणि तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की आहारातील प्रत्येक पोषकांशाचे प्रमाण किती याचा अंदाज बांधता येतो. त्यानुसार ज्या आहारीय घटकांमध्ये आयर्नचे मुबलक प्रमाण असते त्यांचा आहारात वापर करणे ईष्ट ठरते.
हालीम (अहाळीव),खजूर, करवंद, बीट, गाजर गुळ, बदाम, हातसडीचा तांदूळ, लाल साळीचा भात, लाल पालेभाजी, हळद,कारळे यामध्ये आयर्नचा मुबलक साठा असतो.
महाराष्ट्रात तांदूळ, गहू, नाचणी व ज्वारी या धान्यांचा दैनंदिन आहारात वापर होतो. नियमित व योग्य आहारामुळे रोजची आयर्नची गरज पूर्ण होते पण काही आजारांमध्ये शरीरातील आयर्न प्रमाणापेक्षा कमी होते. अशा वेळी आहाराकडे जागरुकतेने बघून आहारात बदल करणे योग्य ठरते. पालेभाज्यांमध्ये आयर्न चांगल्या मात्रेत असते. आपण आयर्न मिळवण्यासाठी बीट व गाजर चा वापर करा असे सर्रास सांगतो पण गमतीची गोष्ट अशी आहे की बीटपेक्षा बीटच्या पानांमध्ये व गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये आयर्न अधिक प्रमाणात असते.
घटक
आयर्नचे प्रमाण : mg / 100 gm
बाजरी : 8
गहू : 4.9
ज्वारी : 4.1
नाचणी : 3.9
हातसडीचा तांदूळ : 3.2
चणाडाळ : 5.3
चवळी : 4.4
अहाळीव : 28.6
हरभऱ्याचा पाला, चवळीचा पाला, लाल माठ, अळूची पानं, शेपू, मुळ्याची पान, विड्याची पानं  यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात मिळते.

आपल्याकडे बाळंतीणीला जेवणानंतर विडा खायला द्यायची पद्धत होती. त्यात विड्याचे पान, कात, तीळ, खोबरं यांचा अभ्यास केल्यास लक्षात येते की या सर्वांमध्ये उच्च प्रमाणात लोह घटक असतात व बाळंतपणात रक्तस्त्रावामुळे आलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी तसेच पोट साफ रहाण्यासाठी याचा चांगला उपयोग होत असे.
पूर्वीच्या अनेक आहार पद्धतींचा आधुनिक शास्त्राप्रमाणे अभ्यास केल्यास आपणाला त्यातील शास्त्रीय तत्व नक्की लक्षात येईल.
दरवर्षी 10 जानेवारी हा दिवस Dietetics  day म्हणून साजरा होतो. यंदाचे वर्ष आहारतज्ञांच्या वतीने अॅनिमिया या विषयाची जागृती करण्याचे ठरवले आहे, म्हणून हा लेखप्रपंच ...!

डॉ गौरी गणपत्ये
स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ
जावे त्याच्या वंशा ...

आपली imagination power कितीही चांगली असली तरी जो पर्यंत एखादा अनुभव स्वत:ला येत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता समजत नाही. म्हणजे असं की समोर खड्डा आहे हे माहीत असतं पण खड्ड्यात प्रत्यक्ष पडल्यानंतरच समजतं किती आणि कुठे रक्तबंबाळ झालंय ते! टेकडीवर चढताना दम लागतो हे माहीत असतं पण प्रत्यक्षात चालायला लागल्यावरच समजतं की किती अंतरावर घामटं फुटतंय ते. एका अर्थी बरयं ते ... एकतर स्वत:चा कस लागतो आणि समोरची व्यक्ती खरं सांगत होती निदान एवढा तरी विश्वास बसतो. पण आजकाल मी नाही कुणाला काही सांगायला जात. ज्याने त्याने ज्याचे त्याचे अनुभव घ्यावे. आपलं अनुभव विश्व संपन्न करावं. पूर्वी मला एखादा वाईट अनुभव आला की माझ्यामागून येणाऱ्या व्यक्तीला मी आवर्जून माझा अनुभव सांगत असे, उद्देश इतकाच की “पुढच्यास ठेच, मागचा शहाणा”. पण बरं झालं मलाही अनुभव आला – “जावे त्याच्या वंशा". आपण चांगल्या भावनेनं सांगायला जावं आणि कुणी आपल्या कडेच संशयाने पहावे यासारखा झटका नाही. लागलाय असा अनेकदा झटका मला.

आईपणाच्या कळा सोसल्याशिवाय मातृत्व म्हणजे काय ते समजत नाही म्हणतात ते काही अंशी खरंय .. मी लहान असताना आई मला हौसेनं फ्रॉक शिवायची. पण मी मात्र त्याची बाहीच घट्ट झाली, त्याचा पट्टा असाच आहे, ती फ्रील अशीच लावली अशा तक्रारी करत असे. आईला वाईट वाटत असेल असा विचार त्या वयात मनात यायचा नाही, पण जेव्हा मी स्वत: आई झाले तेव्हा पुरेपूर अनुभव आले. एखादा पदार्थ छान कौतुकाने केल्यावर माझा मुलगा म्हणे आई, ह्याचा रंगच असा आहे, त्याचा वासच असा येतोय. बरं, मी खाऊन बघितल्यावर मला तर तो चांगला लागत असे. अशा वेळी मला मनातून वाईट वाटायचं आणि खजील ही होत असे. मी आई झाल्यानंतर हळवी अधिक झाले. पूर्वी एखादा पिक्चर बघताना emotional scene बघताना मी माझ्या मनाला समजावत असे की हा पिक्चर आहे, हे सगळं खोटं आहे, ही acting आहे. पण आई झाल्यापासून मी पिक्चर बघणंच सोडून दिलं आहे. एखादा भावनिक प्रसंग विशेषत: लहान मुलांच्या बाबतीतला मला कळत असूनही वळत नाही अशी अवस्था होते. मेंदूला समजत असतं हे सारं खोटं आहे पण मन आणि डोळे दोन्ही भरून येतं. स्वत:च्या सोडाच, त्या पिक्चर मधल्या छोट्या मुलाच्या बाबतीत सुद्धा माझं मातृत्व उफाळून येतं. मला एखाद दिवशी उशीर झाला की आई उगाचच काळजी करीत असे, मी विचारल्यावर मला सांगायची, ते तुला आई झाल्याशिवाय नाही कळणार..... एकदा मी दवाखान्यात गेले असताना सासऱ्यांचा फोन आला, आपला सुमेध घरात दिसत नाहीये, तू ताबडतोब घरी ये. दवाखाना ते घर हे तीन किलोमीटर चे अंतर मी कशी आले असेन आणि वाटेत किती विचार आले असतील ते माझं माहीत. घरी आले तर तो शांतपणे आजीच्या मांडीवर बसलेला बघून जीव भांड्यात पडला. दाराच्या पाठ्मागे लपल्या लपल्या तिथेच डुलकी लागून तो झोपला होता.जेमतेम अर्ध्या तासाचा वेळ गेला असेल, पण त्या अर्ध्या तासात माझ्यातली आई पुरती हादरली होती आणि माझ्या आईच्या बोलण्याचा अर्थ मला पुरेपूर समजला होता. अशीच अवस्था जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत. मी डॉक्टर असल्याने जन्म मृत्यु याबाबत फार भावनाप्रधान होत नाही. अगदी नवीन शिकाऊ डॉक्टर असताना एकदा एका हॉस्पिटल मध्ये नोकरी करत होते. नेहमीप्रमाणे राउंड घेण्यासाठी वॉर्ड मध्ये फिरत होते, तेवढ्यात एका आजोबांचा घर्र घर्र असा आवाज यायला लागला. मी नाडीचे ठोके तपासण्यासाठी हात हातात घेतला आणि त्यांचा हात माझ्या हातात असतानाच त्यांचा आवाज आणि ते दोघेही शांत झाले. त्या क्षणी मला सुचेचना की तो हात तसाच हातात ठेवायचा की हात खाली ठेऊन दुसऱ्या कोणाला हाक मारायची ते. आजारी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर गेल्याचे अनेक प्रसंग मी अनुभवले आहेत. त्यानंतर होणारा नातेवाईकांचा आक्रोश सुद्धा जवळून बघितला आहे. पण अगदी जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत त्यांच्या काय भावना असतात ते जोपर्यंत माझ्यावर ती वेळ आली नाही तोपर्यंत मला त्याची तीव्रता कळली नाही. समोरची व्यक्ती जाणार आहे हे माहीत असूनही आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत तिचा आधार वाटत असतो. आपल्याला अंगाखांद्यावर खेळवणारी आपल्यासमोर निष्प्राण देह बनून झोपली असते, तेव्हा ते बघणं किती कठीण आणि किती असहाय असतं हे अनुभव घेतल्याशिवाय नाही कळत. वडिलांच्या बाबतीत हा अनुभव घेतल्यानंतर पोरकं होणे म्हणजे काय वाटतं याचा अनुभव आला, जो शब्दातही नाही व्यक्त करू शकत.   

प्रेम ही मन आणि जीवन आल्हाददायी करणारी भावना आहे असे कवी म्हणतात, प्रेमामुळे जीवन रंगीत होते असे वर्णन आपण कथा कादंबऱ्या मध्ये वाचतो. पण हे रंग किती लोभस आणि उत्साहवर्धक आहेत हे प्रेमात पडल्यावरच कळतं ना. एखादी कविता वाचणं आणि ती शब्द न शब्द अनुभवणं यात नक्कीच फरक आहे आणि असे प्रेम अनुभवणे हा खूपच सुंदर अनुभव आहे. एखादी रागीट व्यक्ती प्रेमात पडल्यावर एकदम प्रेमळ होऊन जाते तर एखादी घाबरट व्यक्ती प्रेमात पडल्यावर इतकी धीट होते की प्रेमासाठी प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला तयार होते.  ही प्रेमाची ताकद नाही का ? ती व्यक्ती प्रेमात पडल्याशिवाय तिच्या कोणत्या गुणाला पैलू पडेल हे सांगता येत नाही. प्रेमातली आसक्ती आणि विरह किती उत्कट असतो हे ज्याचे त्यानेच अनुभवणे योग्य नाही का? आपणही हे जोपर्यंत अनुभवत नाही, तोपर्यंत दुसऱ्याची भावना, त्याचं दुख: समजून घेण्याची पात्रता आपल्यात तरी कशी येणार ? हळवे अनुभव येतात तसेच हसरे अनुभव सुद्धा येतात.  

आपण एखाद्याला सावध करून सुद्धा ती व्यक्ती हट्टीपणा करून तो अनुभव घ्यायला जात आहे असे जाणवले की मी पूर्वी डिस्टर्ब होत असे, माझ्यावर विश्वास नाही याचं मला वाईट वाटत असे. आता मात्र मी शांत झाले. असा आगाऊपणा करणाऱ्या लोकांच्या बाबतीत मी त्यांच्या नकळत त्यांचे निरीक्षण करत बसते. अगदीच रहावलं नाही, तर धोका सांगते त्यांना, पण नाही ऐकलं तर त्रागा नाही करून घेत. घेऊ दे नं त्यांना त्यांचा अनुभव ? आणि त्यांचा अनुभव माझ्याच सारखा वाईट असेल कशावरून ? उलट त्यांच्या अनुभवातून मला माझं वाईट मत बदलण्याची संधी मिळतीये हे काय कमी आहे का ? चांगले वाईट सगळे अनुभव आल्याशिवाय व्यक्ती अनुभव संपन्न आणि अनुभव संपूर्ण होत नाही. जेवणाच्या ताटात जसं एकाच चवीचे पदार्थ खाऊन मजा येत नाही, तसं आयुष्यात आंबटगोड, थोडेसे कडू, कधीतरी झटका बसवणारे असे तिखट अनुभव सुद्धा आले पाहिजेत.

आता मी ही शहाणी झालेय. आता मलाही कळून चुकलंय की अनुभव हाच मोठा गुरु आहे. वयाची maturity म्हणत असावेत ती हीच असावी बहुतेक. अनेक पावसाळे घालवल्यानंतर उशिरा का होईना सुचलं हे शहाणपण यातच आनंद मानायचा ...
डॉ. गौरी गणपत्ये
माणगाव, ता- कुडाळ
जि – सिधुदुर्ग
९४२३५११०७०
नाते जुळले मनाशी मनाचे....

सहज कुणाशी कधी नातं जुळेल हे सांगू शकत नाही आपण. कधी कधी रक्ताची नाती फिकी पडतात पण कमावलेली नाती प्रसंग निभावून नेतात. नात्याच्या बाबतीत “आदर्श” असं काहीच नसतं. आदर्श हा शब्दच मुळी फसवा आहे आणि त्याहीपेक्षा तो सापेक्ष अधिक आहे. असं सापेक्ष नातं ज्याच्या सुरुवातीपासूनच अपेक्षा आहे, ते आदर्श असूच शकत नाही. त्यापेक्षा नात्यात आनंद किती आहे हे महत्वाचं.  नातं मग ते कोणतंही असो, नातं फुलवणं ही एक कला आहे. नवरा बायकोचं असो, मैत्रीचं असो वा पालकत्वाचं असो, नात्यात आणि फुलात म्हणलं तर साम्य आहे. नातं आणि फुल भरात असताना त्याच्या सुगंधात आपण न्हाऊन आणि मोहरून जातो, कालांतराने फुल कोमेजतं आणि सांभाळलं नाही तर नातंही. पण नातं सदाबहार आणि टवटवीत ठेवणं आपल्या हातात आहे ! नातं हे लाजाळूच्या झाडासारख असावं. दुखावलं गेलंच कधी तर आतल्या आत मिटून घेतं स्वतःला. त्रागा नाही, भांडाभांडी नाही, आदळ आपट नाही, काही वेळ गेला की आपणहून तरतरीत होऊन पूर्वीइतकेच फ्रेश ! नातं म्हणजे संध्येच्या आकाशातील वेगवेगळ्या छटा. एखादा रंग अगदी मनोहर, तर एखादा अगदी विसंगत ! एखादा रंग आवडला नाही तर ते सांगण्याइतकही नातं मोकळं हवं आणि एखादा रंग आवडला नाही म्हणजे आख्खं चित्रच टाकाऊ आहे असे मानण्याइतके बालिशही नको.
जन्मानंतर आपोआप चिकटणारी कितीतरी नाती आपण तितक्याच प्रेमाने जपतो...आईचे वात्सल्य, बाबांचा धाक, भावाचा सपोर्ट, बहिणीचं sharing, आज्जी आजोबांचे संस्कार हे त्या नात्यात मनापासून गुंतल्याशिवाय नाही येत. कितीतरी उदाहरणं देता येतील. जातीपातीच्या पलीकडेही जपली जातात काही नाती. कधी दवाखान्यात तपासायला आलेली मुस्लिम बाई तोंडावर हात फिरवून म्हणते, बच्चे, अपनी सेहत की तरफ भी ध्यान दे, देख कितनी दुबली हो गयी है. तर कुणी ख्रिश्चन फादर जाताना डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद देतात, “God bless you my child.”

नातं सजीवांशीच जडतं असं नाही. आपण रहातो ती वास्तू आणि आपल्या आवडत्या वस्तू यांच्याशी सुद्धा आपलं नातं जुळलेलं असतं. घरात माणसांबरोबर रहाणारी मांजरं, कुत्री काय कमी लळा लावतात? गोठ्यातल्या गाईचं प्रेमाने चाटणं असो किंवा बाहेरुन आल्या आल्या कुत्र्याने आपल्या दिशेने घेतलेली झेप असो सहवासाच्या आणि स्पर्शाच्या मायेवरच ही नाती टिकून असतात.

प्रत्येक नात्यात एक ऊब आहे, त्या दोघांपुरती जाणवणारी. जशी आपल्याला समोरच्यामुळे जाणवते तशी आपल्यामुळेही समोरच्याला जाणवतेच की! याची जाणीव दोघांना असली आणि ती जाणीव जाणीवपूर्वक जपली की ते नातं सुखावत जातं, बहरत जातं. जो पर्यंत ही ऊब दोघांना जाणवते तो पर्यंत त्या नात्याचे shelf life ! ऊबेचा चटका झाला तरी कठीण आणि थंडी भागेनाशी झाली तरी कठीण! प्रत्येक नात्याला त्याची स्वत:ची स्पेस द्यायला हवी. काहीतरी चुकायला लागलयं हे चटकन ओळखता यायला हवं. आपल्या परीने आपण धग टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा - दुसऱ्यासाठी आणि स्वत:साठीही. सांभाळता येईल तेवढी गोधडी सांभाळायची. आनंदाने जमतील तेवढी ठिगळं लावायचा प्रयत्न करायचा पण फाटायला द्यायची नाही. असंही होईल कधी, एखाद्या नात्याची वीण इतकी उसवेल, घडी इतकी विस्कटेल की ठिगळं लावायला जागाही शिल्लक रहाणार नाही. अशावेळी शांतपणे त्या गोधडीची घडी करून मनाच्या कपाटात बंद करून ठेवायची आणि काढायची थोड्या दिवसांनी बाहेर.पांघरून बघायची पुन्हा अंगावर एकदा. पुन्हा प्रकर्षाने तीच ऊब जाणवली तर ते नातं खर आहे, मग अशावेळी विचार नाही करत बसायचा माघार कोण घेणार..तू की मी ? पुढाकार घेऊन बघायचं. समोरच्यालाही जाणवली ऊब तर येईलच हात पुढे. नाहीच आला, तर आहे का काही अडचण ? घ्यायचं समजून आपणहून...आणि तरीही नाही उघडलं दार तर जड मनाने विसरून जायचं सगळं. पण नात्याचं ओझं दुसऱ्याला वाटू द्यायचं नाही.त्याच्या आयुष्यातली आपली भूमिका संपलेली आहे हे शांतपणे accept करायचं. कधी काळी या ऊबेने आपल्याला माया लावली होती हे मात्र आपल्यापुरते तरी विसरायचे नाही.

एक छान गाणं आहे – “चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो..” खूप आवडतं मला. कोण काय बघतं या गाण्यात मला माहीत नाही, पण मी अर्थ घेते की नात्याचं रिचार्ज करणं खूप गरजेचं आहे. खरचं छान concept आहे ना ? बरेचदा असे होते की एखादं नातं घट्ट व्हायला लागलं की दोघांपैकी एक समोरच्याला गृहीत धरायला लागतं. कदाचित ते त्याला / तिला कळतही नसतं, फक्त समोरच्याला जाणवत असतं. अशावेळी बोललो तरी पंचाईत आणि नाही बोललो तरी पंचाईत अशी समोरच्याची अवस्था होते. आपल्याला ते नातं तर हवं असतं, पण ते गृहीत धरणं नको असतं. नातं जर खरं असेल तर समोरच्याच्या लक्षात येतंच ते, पण नाहीच आलं लक्षात तर ते नात्याचं दुर्दैव म्हणावं लागेल. कधी तरी असंही होतं, एखाद्या नात्यात आपली जितकी involvement आहे तितकी समोरच्याची आहे की नाही अशी शंका यायला लागते. अशावेळी छोटासा लपंडावाचा किंवा आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळावा. आपण लपून बसून समोरचा शोधतोय का आपल्याला ? याचा शोध घ्यायचा. समोरच्याच्या डोळ्यावर पट्टी असताना त्याला हाक देऊन दिसेनासं व्हायचं. आजूबाजूला वावरत असतो आपण, पण हाती मात्र लागत नाही. समोरची व्यक्ती येतेच  अंदाजाने आपल्याजवळ आणि नेमकं आपण उभे आहोत तिथे समोर येऊन उभी रहाते. त्यावेळी त्याच्या नकळत आपणहून out होण्यात सुद्धा एक मजा आहे. “नातं दोघांनाही हवय” ही भावना खूप उबदार आहे.

नातं म्हणजे सांजवेळचा तुळशीजवळचा दिवा. कितीही वारा असला तरी तो तेवत रहातो. तो शांत होऊ नये म्हणून तुळशी वृन्दावनाला आपण कोंदण करतो....मनालाही तसे कोंदण करता येईल का...? नातं जपण्यासाठी जशी भेट महत्वाची तितकचं सतत न भेटणंही महत्वाचं. शेवटी नातं टिकवायला योग्य अंतर आणि निर्मळ अंतर जास्त महत्वाचं नाही का?

डॉ. गौरी गणपत्ये
माणगाव, ता – कुडाळ,
जि- सिंधुदुर्ग  
9423511070
क्या खोया क्या पाया....

साधारण महिन्याभरापूर्वी दवाखान्यात एक मुलगी आली. मुलगीच ती... कारण कडेवर असलेल्या पोराने बहाल केलेलं  आईपण नावापुरतंच दिसत होतं. ते दीड दोन वर्षांच  पोर त्या आईचे केस ओढत होतं, तिच्या अंगाखांद्यावर खेळत होतं पण ती शून्यात नजर लाऊन बसली होती. आईने सांगितले, “बाईनु, आता तुमीच सांगा हिका समजावून. आमका जमतला तसा आमी ह्येका बाळगूक तयार असो...पण ह्या म्हणता परत कामात जातंय. आता चेडवाची चूक आमी पदरात नाय घालतलो तर कोण घालतला ? आणि आउस नाय तर बारको कसो रवतलो?”  काहीतरी गडबड आहे हे माझ्या लक्षात आलं. तिला तपसणीच्या निमित्ताने दुसऱ्या खोलीत पाठवलं आणि आईशी बोलले. माझ्याच कडे हिची डिलीव्हरी झाली होती. त्यानंतर ती माहेरीच होती. कारण नवरा परत आलाच नाही. तो परगावातला... आसाममध्ये त्याचं मूळ घर. गोव्यात एकाच ठिकाणी दोघे कामाला होते. तिथेच यांचं प्रेम जुळलं. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता तिने आणि त्याने लग्न केलं. यथावकाश प्रेग्नसी राहिली. तो म्हणाला, आईकडे डिलीव्हरी होऊ दे, मग इथली नोकरी सोडून आसामला गावाकडे जाऊ. ती तपासणीसाठी यायला सुरुवात झाली. मधेच मी एकदा तिला विचारले तू तुझ्या सासरच्यांना कधी भेटलीस की नाही? ”नाही अजून” असे तिने उत्तर दिले. सात आठ महिन्यानंतर तिने काम सोडून दिले. आता ती आईकडेच रहायला आली. तो अधून मधून तिला भेटायला येत असे. डिलिव्हरीच्या वेळी मात्र पूर्णवेळ हॉस्पिटल मध्ये होता. डिसचार्ज घेऊन ती जी घरी गेली ती त्या दिवशीच उगवली. मधल्या काळात झालेल्या घडामोडी आईकडून समजल्या. तिच्या डिलीव्हरी नंतर तो तिच्या माहेरी यायचा हळू हळू कमी झाला. एकदा आला तेव्हा म्हणाला, गावाकडे जाऊन येतो, आता पंधरा दिवस तिकडेच असणार. त्यानंतर आता इतके दिवस झाले त्याचा काही पत्ता नाही. मी आईला विचारलं, तुम्ही फोन नाही का केला? तिने सांगितलं तो फोन आता लागत नाही आणि त्याची कोणतीच identity तिच्याजवळ नाही. त्याचे गाव कोणते ते तिला नक्की माहीत नाही आणि तिकडचा पत्ता सुद्धा तिला माहीत नाही.... वाईट वाटलं सगळं ऐकून पण मी काहीच करू शकत नव्हते. ही एक टोकाची केस सोडली तर हल्ली बाहेर गावी आणि विशेषत: गोव्यात कामासाठी जाऊन राहणाऱ्या मुलींचे प्रॉब्लेम ही एक नवीन मालिका सुरु झाली आहे.

माझ्या स्त्रीरोगतज्ञ या  डिग्री सोबतच माझ्या नावापुढे ‘आहारतज्ञ’  अशी अजून एक डिग्री आहे. ती पाहून पेशंट तपासून होण्याआधीच काही आया आपल्या मुलींसाठी आहाराचा सल्ला विचारतात. कोवळ्या वयात निस्तेज पडलेल्या मुलीची काळजी आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते. मुली बघाल तर  20 -22  वर्षाच्या.
काय करतात. ....?
नोकरी...
कुठे ......?
गोव्यात, फार्मा कंपनीत ......
रहातात कुठे .....?
6-7 मुली एकत्र खोली घेऊन ......
जेवतात कुठे .....?
स्वतः चे जेवण स्वतः बनवतात.....
ड्युटी 8 ते 5 , कंपनी लांब, त्यामुळे साडे सहा वाजताच घर सोडतात.....नाश्ता नाही....डब्यात आमटी भात....रात्री भात आमटी.....
पगार 7 हजार, घरभाडे 500, जेवणाचे 1500 मिळून 2000 खर्च आणि 5000 हातात ...
रहाणीमान पाहून कपडालत्ता, मोबाईल रिचार्ज आणि इतर खर्च माझ्या नजरेतून चुकत नाही.....
सगळीकडे थोड्याफार फरकाने हाच साचा. हल्ली या साच्यातले खूप पेशंट बघण्यात येतात.
या सगळ्या चिमुकल्या मुली माझ्या नजरेसमोर मोठ्या झालेल्या.
आईचा पदर धरून दवाखान्यात येणाऱ्या.
बघता बघता इतक्या मोठ्या झाल्या......?
आई वडीलांचं राहणीमान नाही बदललं..... पण मुली मात्र किती बदलल्या. .....!!
जीन्स पॅन्ट, शॉर्ट टॉप, लिपस्टिक आणि मोबाईल शिवाय या मुली दिसतच नाहीत कधी.....
आई बापाच्या मुली..... घरापासून दूरावलेल्या...
लग्ना आगोदरच माहेरपण हरवलेल्या ...
घरासाठी कमावत्या झालेल्या. ...
कमावत्या की गमावत्या.....??
खूप मोठ्ठा प्रश्न आहे......
कमावत्या कमी आणि गमावत्या जास्त....

घराबाहेर पडलेल्या  या मुलींच्या रहाणीमानात प्रचंड फरक पडला, खेडेगावात रहाणाऱ्या, फॅशनचा गंध नसलेल्या मुली एकदम मोकळ्या वातावरणात गेल्या आणि हरखल्या..... भुलभुलैय्या मायाजालात अलगदपणे ओढल्या गेल्या. जेमतेम दहावी बारावी झालेल्या या मुली. शाळा कॉलेज सोडून  घरासाठी घराबाहेर पडलेल्या... कळकट खुराड्यात मळकट वातावरणात झोकून दिलेल्या... बाह्य सौंदर्याला अवास्तव महत्व देताना आंतरिक सौंदर्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायला शिकल्या. निरोगी शरीर ही सौंदर्याची मोठ्ठी खाण आहे, हे विसरल्या. ह्या सर्व मुलीमध्ये आढळणारी आजारपणाची टिपिकल लक्षणे आहेत. या मुलीमध्ये अॅनिमिया, पाळीचे विकार, इतर nutritional deficiencies, त्वचेचे विकार, पित्ताचे विकार आढळतात. यांना स्त्रीरोगतज्ञ आणि आहारतज्ज्ञ म्हणून मी चौरस आहार, सकस आहार, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स कितीही काही सांगितलं तरी 1500 रुपयात त्या महिनाभर फक्त आमटीभातच खाऊ शकतात कारण  उरलेले पैसे घरी द्यायचे असतात.  त्यांना हे सकस आहाराचे चोचले  परवडणार आहेत काय? सुरवातीला नव्याचे नऊ दिवस असताना मिळणारा पैसा पाहून आईबाप सुखावतात, मुलगी संसाराला हातभार लावतेय या जाणीवेने मुलीचं बदलत चाललेलं वागणं  सहन करत रहातात. पण काही दिवसातच त्यातल्या अनेक मुली खाण्यापिण्याची आबाळ होऊन आजारी पडतात, काहींना कंपनीतल्या A.C. चा त्रास होतो, काही प्रेमात पडून लग्न करून मोकळ्या होतात तर काहींची मात्र प्रेमात फरफट होते, काही मुली फसवल्या जातात. काहींचं फेसबुक, Whats app च्या आहारी जाऊन आयुष्याचं गणित चुकत जातं आणि आईबापांच्या लक्षात येईपर्यंत मुलगी हाताबाहेर गेली असते.....

आता आईबापांचा आग्रह असतो, नोकरी सोड म्हणून. पण तितकं सोपं आहे का ते? त्यातल्या बऱ्याच जणी नाही रमत घरी.... मग एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरी शोधायची.... मी सुद्धा त्या मुलींना माझ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी ऑफर करते. पण छानछोकीला आसुसलेल्या पोरीचं मन आता खेडेगावात रमत नाही. आईबापांसोबतच माझेही उपाय थकतात आणि शेवटी मी ही त्यांच्या कमावत्या वयातल्या गमावत्या गोष्टींचा हिशोब मांडत हताशपणे त्यांचं हरवणं बघत बसते.

डॉ. गौरी गणपत्ये, माणगांव , ता- कुडाळ , जि – सिंधुदुर्ग
शो मस्ट गो ऑन....

एखाद्या पेशंटचे वेळेवर निदान करावे आणि योग्य वेळेत त्याचा उपचार होऊन पुन्हा तो thanks म्हणण्यासाठी आपल्याकडे यावा यासारखे satisfaction मेडिकल field मध्ये दुसरे कोणतेही नाही. या सुखाचे मोजमाप पैशांच्या तागडीत करताच येत नाही, आपलाही correct diagnosis केल्याचा इगो सुखावतो. पैसा कितीही ओतला तरी अशा समाधानाचे पारडे जडच असते. हा माझाच नाही तर सर्वच डॉक्टर मंडळींचा अनुभव आहे. पेशंट बरा झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे सुख बघण्यात काही वेगळेच समाधान असते. हे समाधान आणि पेशंटकडून मिळणाऱ्या आदराची वागणूक हेच खरं आम्हां डॉक्टर मंडळींच टॉनिक असतं. हा अनुभव वरचेवर घेण्यासाठी आम्ही मंडळी झगडत असतो. पण आज मला वेगळाच अनुभव आला. ज्या पेशंटच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे सुख पसरलं ते हिरावून घेण्याचं पातकही मलाच करावं लागलं. अजूनही त्या पेशंटचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहीये. अज्ञानात असलेले सुख तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होतं आणि ते सुख हिरावून घेण्याचं मोठ्ठ पाप मला करावं लागणार होतं.

हीच पेशंट माझ्याकडे साधारण ३-४ वर्षांपूर्वी उजव्या बाजूच्या छातीत गाठ आलीये म्हणून आली होती. तपासल्यानंतर मला शंका आली की ही कॅन्सरची गाठ असावी. त्यानंतर पुढील काही तपासण्या करून घेतल्या. खात्री झाल्यानंतर मी पेशंटला पुढे जाण्याचा सल्ला दिला. पेशंट टाटा कॅन्सर हॉस्पिटलला गेली, तिथे operate झाली. ऑपरेशन नंतर आधी नियमितपणे आणि नंतर - नंतर काही त्रास झाल्यास न चुकता ती माझ्याकडे येत असे. ऑपरेशनची जखम, स्त्रीत्वाची पुसून टाकलेली खूण, डोक्यावरचे गेलेले केस हे सगळ तिनं हसत हसत स्वीकारलं. प्रत्येक वेळी आवर्जून तुम्ही कसं वेळेत निदान केलंत आणि मुलाने सुद्धा मुंबईत कशी धावपळ केली याची आठवण काढत असे. “तुमच्या आन देवाच्या कृपेने मी आता बरा आसय, माका मागचो कसलोच त्रास आता वाटना नाय” असे हसऱ्या आणि आत्मविश्वासपूर्ण चेहऱ्याने सांगत असे.

हल्ली पंधरा दिवसांपूर्वी ती तपासायला आली. “बाईनु, हल्ली बरीशी भूक लागणा नाय....वाईच काम केला की लगेच अशक्तीपन येता....बगा बगुया माका आन बरासा टोनिकचा औषद देवा.....माका बरीशी भूक लागान दे....तरतरीपन येऊक होया”... अशी अपेक्षावजा ऑर्डर तिने सोडली....तपासताना लक्षात आलं, एवढेसे बोलतानाही तिला धाप लागतीये...तरी नेहमीप्रमाणे तिने सांगितलेच,” बाईनु मागच्या सारख्या काय वाटना नाय, वायच जरा थकावपन इला म्हणून इलय”....माझ्या डोक्यात मात्र वेगळंच चक्र सुरु झालं. कॅन्सर ची treatment पूर्ण झाल्यानंतर सुद्धा दर सहा महिन्यांनी ती नियमितपणे टाटा हॉस्पिटलमध्ये तपासणी साठी जात होती. मी सहजपणे विचारलं ह्ल्ली चेकअपला कधी जाऊन आलीस ...? “बाईनु    डिसेंबर मैन्याक जाऊन इलय...आता जूनाक बोलावला हा....लावणीक झील येतलो, तेच्या वांगडा जातलय” तिची बडबड सुरु होती......माझ्या डोक्यातली शंकेची पाल काही केल्या जाईना. मी तिच्या नवऱ्याला केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं उद्या सोनोग्राफीचे डॉक्टर येणार आहेत. आपण हिची सोनोग्राफी करून बघुया....नवराही लगेच तयार झाला....”चलात, करूकच होई सोनीग्राफ ....आजकाल जेवणावर मनशा जाणा नाय तिची”....पण माझ्या डोक्यात काय चालले आहे त्याचा त्या दोघांना सुतराम सुद्धा अंदाज नव्हता. तिचा त्याही परिस्थितीत हसरा चेहरा आणि माझ्यावर असणारा प्रचंड विश्वास मला पुढे काही बोलायला देईना.....”या उद्या”.....असे सांगून मी पुढच्या पेशंट कडे वळले....

सोनोग्राफीच्या खोलीत सुद्धा ती हसतमुखाने आली....डॉक्टरांनी सोनोग्राफी करता करता प्रश्न विचारायला सुरुवात केली....त्यांनाही हिने हसत सांगितले, “माजा कॅन्सरचा ओप्रेशन झाला हा....बाईंनी खटपट करून माका जगवून घेतल्यानी.... पण आता माका तेचो काय एक त्रास नाय”....सोनोग्राफी चालू होती, मला मात्र पोटात एकदम धस्स झालं .....माझं पूर्ण लक्ष सोनोग्राफीच्या स्क्रीन वर होतं.....आणि डॉक्टरांचा probe लिव्हरच्या एरीयावर फिरत होता....संपूर्ण लिव्हर मध्ये गोल गोल आकाराच्या चकत्या दिसत होत्या....डॉक्टर विचारत होते, भूक कमी लागते का, थकवा वाटतो का ....? आणि डॉक्टरला आपण न सांगता कसं काय कळलं म्हणजे डॉक्टर नक्की चांगला आहे या आनंदात ती जोरजोरात मान डोलवून सांगत होती....”होय होय, भूकच कमी लागता, म्हणानच बाईंन कडे इलय”.....माझा चेहरा मात्र साफ पडला होता....मला निदान कळून चुकलं होतं.....चार वर्षं दडी मारून बसलेल्या कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं होतं आणि आता तर शरीरातला महत्वाचा अवयव लिव्हर, त्यावरच घाला घातला होता...आता या आजाराचे निदान Metastasis म्हणजे पसरलेला कॅन्सर असे झाले होते. यात पुढे करण्यासारखं काही फारसं शिल्लक नव्हतं. डॉक्टर रिपोर्ट सांगत होते आणि मी तो type करत होते.....पण डोकं मात्र सुन्न झालं होतं....आता हिच्या प्रश्नांना मी काय उत्तरं देऊ ..? मेडिकल सायन्ससुद्धा या केसमध्ये काही करू शकत नाही हे तिला कसं समजावून सांगू ? पेपर मध्ये, TV वर जाहिरातीतून कितीही सांगितलं तरी कॅन्सर बरा होणं हे नशिबावरही अवलंबून आहे हे तिला आणि तिच्या नातेवाईकांना कसे पटवून देऊ...? तिच्या पुढे अजून सात आठ पेशंट होते....नंतर रिपोर्ट सांगायला केबिनमध्ये बोलावते असे सांगून आम्ही पुढच्या पेशंटकडे वळलो.....पुढचा पाऊण तास मी मनातल्या मनात उजळणी करत होते की हिच्याशी कशा पद्धतीने बोलू.. ..? मला तिच्या चेहऱ्यावरच हसू घालवण्याच पातक करायचं नव्हतं ...पण तिला व तिच्या नातेवाईकांना सांगितल्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. शेवटी शक्य तितका तिचा चेहरा बघण्याचे टाळत तिच्या नवऱ्याला सांगितले तुम्हाला लवकरच परत टाटामध्ये जावे लागेल...तरीही तिने विचारलेच....”बाईनु, पण तारीक जुनची दिल्ली आसा....तेव्हा गेलय तर नाय चलाचा ...?” मी पटकन बोलले, “नाय गे....ह्या मागच्यातला वाटता” ....”असा हा काय ?” म्हणत ती जराशी गंभीर झाली पण पुढच्याच क्षणाला आत्मविश्वासाने म्हणाली, “तुमी सांग्तास तर आमी बेगीन जातो. मागच्या टायमाला तुमी खटपट केलास आन माका जगवून घेतलास....माजा तुमच्यावर विश्वास असा.....बरा होतला मा...? तुमी घेतलास मा जवाबदारी ?” माझ्या तोंडून शब्दच फुटेना....कसं सांगू तिला की बाई आताच्या वेळचे निदान वेगळे आहे, इतके उपाय करूनसुद्धा कॅन्सर शरीरात पसरला आहे आणि आता तुझे आयुष्यातले मोजकेच दिवस शिल्लक आहेत...मी मनातल्या मनात आवंढा घोटला आणि तिला शक्य तितक्या हसत सांगितलं, “जास्ती बोला नको, आदी मुंबईच्या डॉक्टराक भेटून ये.... मिया हडेच असंय, मगे भेटू” ....तिला केबिनच्या बाहेर पाठवून मी आधी बेसिनकडे वळले....डोळ्यावर सपासप पाणी मारून अडवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली....चेहरा पुसला आणि शक्य तितक्या हसऱ्या चेहऱ्याने सिस्टरला सांगितले....पुढचा पेशंट बोलाव ......!

डॉ. गौरी गणपत्ये, माणगांव , ता- कुडाळ , जि – सिंधुदुर्ग

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Back to content